महाराष्ट्रात जून महिना निम्मा सरला तरीही यंदा महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2020 च्या निकालाची तारीख स्पष्ट झालेली नाही. राज्यात कोरोना व्हायरसचं संकट असल्याने निकाल लावण्याच्या प्रक्रियेला वेळ लागत आहे. मात्र सध्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम अंतिम टप्प्यामध्ये पोहचलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. नुकत्याचा एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 10वीचे निकाल लावण्यासाठी बोर्डाचे प्रयत्न सुरू आहेत असे म्हटले आहे. दरम्यान जुलै महिन्यात निकाल ऑगस्ट महिन्यात 11वीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया आणि सप्टेंबर महिन्यात वर्ग सुरू करावेत असा विचार केला जात आहे. दरम्यान सध्या कोरोना परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. Maharashtra Board Exams 2020 Results: महाराष्ट्र राज्य 10वी, 12 वी बोर्डाचे निकाल तारखांबाबत शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण; विद्यार्थ्यांना दिला 'हा' सल्ला.
महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनाची दहशत असल्याने भूगोलाचा पेपर यंदा रद्द करण्यात आला आहे. या विषयाचे मार्क्स विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत अशी घोषणा मंडळाने केली आहे. त्यामुळे यावर्षीचा निकाल आणि प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थी, शिक्षक यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
10वीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येतात. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना शाळेमधून उपलब्ध करून दिली जाते.