Maharashtra Shocker: पतीकडून पत्नीची प्लास्टिकच्या ड्रममध्ये बुडवून हत्या; मालेगाव हादरले, जाणून घ्या कारण
Representational Image (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता नाशिकच्या (Nashik) मालेगावमधून (Malegaon) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागात एका पतीने आपल्या पत्नीची प्लास्टिकच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केली आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील दयाणे शिवारातील एका दर्ग्याजवळ ही घटना घडली. येथे राहणाऱ्या अब्दुल रहमानने पत्नीवर संशय घेऊन तिची हत्या केली.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खान कुटुंबीय मालेगाव येथील रमजान पुरा परिसरात राहते. अब्दुलला पत्नीवर संशय होता आणि यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. अब्दुल हा त्याच्या पत्नीला सतत मारहाण करायचा. 21 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अब्दुलने पत्नीवर हल्ला केला. मारहाणीनंतर त्याने पत्नीला पाण्याच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये बुडवून ठार मारले.

या घटनेनंतर रमजान पुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. तसेच, अदनान खान यांनी रमजान पुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अब्दुल खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक थोरात या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे मालेगाव येथे अजून एका हत्येची घटना समोर आली आहे. (हेही वाचा: Mumbai Police: क्रिकेट स्टंपने डोक्यात प्रहार, 26 वर्षीय कबड्डीपटूची हत्या; धारावी येथील घटना)

मागील भांडणात झालेले वाद मिटविण्यासाठी जमलेल्या मित्रांच्या बैठकीतच, एका तरुणावर जमावाने तलवारीने हल्ला करून त्याला जागीच ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद इब्राहिम समसुदोहा असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.