Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी (Maharashtra Road Accidents) जवळजवळ 45 टक्‍क्‍यांहून अधिक रस्ते अपघात मुंबईमध्ये घडले आहेत. राज्यात झालेल्या एकूण 19,383 अपघातांपैकी 8,768 अपघात मुंबईत झाले. ही धक्कादायक आकडेवारी या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल महिन्यातील आहे. आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या 19,383 अपघातांमध्ये 5,333 लोकांचा मृत्यू झाला असून, 9,120 लोक जखमी झाले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये अहमदनगर (554 अपघात), पुणे (539), नाशिक (536), कोल्हापूर (406) यांचा समावेश आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मुंबईतील अपघात जीवघेणे ठरले नाहीत परंतु या अपघातांमध्ये जखमी झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे.’ परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील इतर भागांच्या तुलनेत मुंबईत अपघातांची संख्या जास्त आहे. यासाठी मुख्यत: मेट्रो रेल्वे, रस्ते बांधणी, ड्रेनेज सुधारणा इत्यादींसह शहराभोवती सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे कारणीभूत आहेत. तसेच खराब रस्ते, रस्त्यांमधील बॅरिकेड्स यांमुळेही काही अपघात झाले आहेत.

वाहतूक तज्ज्ञ म्हणतात, ‘सध्याच्या रस्त्यांची परिस्थिती पावसाळ्यात प्रवास अधिक धोकादायक असेल. रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने रस्त्यांचे योग्य बांधकाम करणे ही एक मोठी समस्या आहे. कार आणि दुचाकींचा वेग अधिक असल्याने शहरात चांगल्या रस्त्यांची गरज आहे.’ (हेही वाचा: Tarkarli Beach Accident: तारकर्ली समुद्र किनारी स्कुबा डायव्हिंग करून येणार्‍या प्रवाशांची बोट बुडाली; दोघांचा मृत्यू)

मुंबईतील वाहनांची संख्या 42 लाखांच्या पुढे गेली असून त्यात जवळपास 22-24 लाख दुचाकींचा समावेश आहे. कोविड महामारीच्या काळात, लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेस यांसारखी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने बहुसंख्य लोक दुचाकीचा वापर करत आहेत. आता कोविड निर्बंध शिथिल केल्यामुळे, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोक पुन्हा वेगाने वाहने चालवू लागले आहेत. अजूनही सार्वजनिक वाहतुकीचा वापर कोविडपूर्व काळाच्या 75-80 टक्केच आहे.