Highest Single-day Recovery of COVID-19: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात आज सर्वाधिक 5 हजार 71 रुग्णांची कोरोनावर मात
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना राज्यात आज मोठ्या संख्येत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 5 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात 5 हजार 71 रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले आहे. मुंबई मंडळात सर्वाधिक 4 हजार 242 एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले आहेत. ज्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 56 हजार 49 वर पोहचली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एक लाखाहून अधिकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आपल्या जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे. ज्यामुळे संपूर्ण देशातून त्यांचे कौतूक केले जात आहे. राज्यात आज कोरोनामुक्त रुग्णांना बरे करण्यासाठीही डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. आज सोडण्यात आलेल्या 5 हजार 71 रुग्णांपैकी मुंबई- 4242, पुणे- 568, नाशिक- 100, औरंगाबाद- 75, कोल्हापूर- 24, लातूर- 11, अकोला मंडळ-22, नागपूर- 29 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा-Online Classes In Maharashtra: महाराष्ट्रात ऑनलाईन माध्यमातून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मान्यता

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे.