Anil Parab | (Photo Credit : Facebook)

रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाच्या पूराचा (Ratnagiri Flood) फटका बसून अनेक नागरिकांचे आतोनात नुकसान झाले. अशा नागरिकांना मदत म्हणून सरकारतर्फे देण्यात आलेल्या आर्थिक मदतीचे (Flood Relief) चेक परत घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकते आहे. यावर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. रत्नागिरीतील पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाद्वारे परत घेतल्याचे वृत्त खरे आहे. हे चेक परत घेण्यामागे कारण आहे. तसेच, प्रसारमाध्यमांतून दाखवले गेलेले वृत्त वस्तूस्थितीला धरुन नसल्याचेही परब यांनी म्हटले आहे.

परब यांनी म्हटले आहे की, ज्या पूरग्रस्तांना चेक दिले त्या परिसरातील बँका आणि पूरग्रस्तांची घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे त्यांना चेक वटविण्यास अडचणी येत आहेत. तसेच, जर ते चेक इतर बँकांमध्ये वटवायचे तर तीस किलोमीटर लांब अंतरावार जावे लागणार होते. काही ठिकाणी ते चेक इतर बँकांमध्ये वटवावे लागणार होते. त्यामुळे स्थानिकांनीच विनंती केली की, तुम्ही शासनाचा प्रतिनिधी आमच्यासोबत द्यावा. त्यामुळे आता हे चेक परत घेण्यात आले आहेत. आता हे चेक शासनाच्या प्रतिनिधीद्वारे बँकांमध्ये डिपॉझिट केले जतील किंवा नागरिकांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा केले जातील, असे अनिल परब म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर, महाविकासआघाडी सरकारचा निर्णय, पाहा तरतुदी)

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून जे वृत्त आले आहे ते वस्तुस्थितीला धरुन नाही असे सांगत परब यांनी म्हटले की, पूरग्रस्त असलेल्या पोसरे गावात मी स्वत: शासनाच्या मदतीचे चेक घेऊन गेलो होतो. आपणच त्या चेकचे वाटपही केले होते. परंतू, गावातील काही प्रतिनिधींनी विनंती केली की, आपच्यापासून बँका 30 किलोमीटर लांब आहेत. त्या बँकांपर्यंत जाण्यास आम्हाला अडचण आहे. तसेच, चिपळूण शहरातील बँकांही पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे खातेधारकांचे खातेक्रमांक शोधण्यास बराच विलंब लागणार होता. परिणामी ते चेक परत घेऊन इतर बँकांतून डिपॉझिट करुन खातेधारकांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचे परब यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी सांगितले की, काही प्रकरणांमध्ये नागरिकांची घरे गाढली गेली होती. त्यामुळे मदतीचे चेक लाभार्थींच्या नातेवाईकांनी घेतले. मात्र, त्यांच्याकडे लाभार्थ्यांचा खातेक्रमांकच नव्हता. त्यामुळे तलाठ्यांनी हे सर्व चेक परत घेतले होते. सध्या सर्व चेक बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटले आहे.