राज्यातील गेल्या 4-5 दिवसांपासून अतिवृष्टी (Heavy Rains) सुरु आहे. या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील अनेक भागात पूर (Flood) आला आहे. या पावसामुळे कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व काही प्रमाणात मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हे प्रभावित झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी सांगितले की, येत्या 24 तासांत पश्चिमेकडील किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होऊ शकते. त्यामुळे पावसाने त्रस्त महाराष्ट्र आणि गोव्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आयएमडीने आपल्या बुलेटिनमध्ये असेही म्हटले आहे की 25 जुलैपासून उत्तर भारतीय मैदानावर आणि डोंगरावर पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. आईएमडीने म्हटले आहे की, येत्या 24 तासांत कोकण, गोवा आणि लगतच्या मध्यवर्ती किनारपट्टीसह पश्चिम किनारपट्टीवरील पावसाच्या तीव्रतेत आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र 24 जुलै रोजी महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. 27 जुलैपर्यंत गुजरातमध्ये पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने शनिवारी सांगितले की, गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वादळी वाऱ्याची शक्यता पाहता, 26 ते 28 जुलै दरम्यान उत्तर व दक्षिण गुजरातच्या सीमेवर अरबी समुद्रात मासेमारी करण्यास न जाण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. पूर्व राजस्थानात 26 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यात घट होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Maharashtra Floods: भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून NDRF ने बाहेर काढले 52 मृतदेह; 1,800 लोकांची सुटका)
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत, लोकांची घरे, शेतजमिनी, पिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत, त्यामुळे पावसामध्ये होणारी घट ही बाब महाराष्ट्रातील लोकांसाठी दिलासा देणारी आहे.