राज्यात अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा एंट्री घेतली आहे. राज्यात येत्या 2 ते 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील 5 ते 7 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे बळीराजा हा सुखावणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी या पावसामुळे सुखावणार आहे. (हेही वाचा - Dahi Handi 2023: दही हंडीवेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दक्ष; 'या' गोष्टींवर असेल बंदी, आदेश जारी)
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपून चालली असून बळीराजा संकटात सापडला आहे. दुबार पेरणी करून सुद्धा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय. अशातच हवामान खात्याने येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे. पुढील 3 दिवस मराठवाड्यातही पावसाचा अंदाज हा वर्तवला आहे.