Dahi Handi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशभरात सध्या कृष्ण जन्माष्टमीची (Krishna Janmashtami) धामधूम पाहायला मिळत आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी राज्यात दहीहंडीचा (Dahi Handi 2023) उत्सव साजरा होता. यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दक्ष आहेत. आगामी दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या आणि पादचाऱ्यांवर रंगीत पाण्याचे फुगे फेकणाऱ्या व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी कडक ताकीद दिली आहे. गुप्त पोलीस अधिकारी अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवतील.

सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने रंगीत पाणी फेकणे आणि दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लीलता पसरवणे यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते. सुरक्षेच्या हितासाठी, मुंबई पोलिसांचे डीसीपी ऑपरेशन्स विशाल ठाकूर यांनी आक्षेपार्ह भाषा, शाब्दिक शिवीगाळ, तसेच सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, स्प्रे पेंट किंवा पावडर फेकणे याला मनाई करणारा आदेश जारी केला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहभागींनी या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवादरम्यान, गुप्त पोलीस अधिकारी सर्व घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी गर्दीत सामील होणार आहेत. मुंबईत 6 आणि 7 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार असून, यावेळी महिलांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस अधिकारी गर्दीत उपस्थित राहणार असून, यासाठी एक समर्पित टीम नेमण्यात आली आहे. (हेही वाचा: Janmashtami 2023: जन्माष्टमी तारीख, पूजेची वेळ आणि शुभ मुहूर्त कोणता? भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करणाऱ्या हिंदू सणाचे महत्त्व आणि पूजा विधी जाणून घ्या)

सुरक्षा उपाय वाढवण्यासाठी, दहीहंडीच्या ठिकाणी पोलीस तैनात असतील आणि शहरातील सुमारे 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हालचालींवर लक्ष ठेवतील. याव्यतिरिक्त, मुंबई पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत केंद्रीय आणि राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण दल, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), जलद कृती दल, फोर्स वन आणि बॉम्ब शोधक व निकामी पथक यासारख्या विविध विशेष तुकड्या असतील. सण सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे साजरा व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.