
मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे तसेच कोकणातील जिल्ह्यात सकाळ पासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली पहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नारिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. राज्यातील विविध भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र काही भागात शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (हेही वाचा - Bhushi Dam Overflows: लोणावळ्यात मुसळधार पाऊस; भुशी डॅम ओव्हरफ्लो)
मागील काही दिवसांपासून कोकणात पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. आजही कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. गुजरातपासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. आजही हवामान विभागानं रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगडमधील खार बंदीस्ताच्या बंधाऱ्याला तडे गेल्यानं परिसरातील 48 गावांना धोका निर्माण झाला आहे.
मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिकेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, हा पाऊस सुरु असताना काही शेतकऱ्यांनी भात पेरण्या केल्या होत्या, त्या मुसळधार पावसामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.