Bhushi Dam

लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 158 मिमी पाऊस पडला आहे. लोणावळ्यात (Lonawala) प्रसिद्ध असलेले सह्याद्रीच्या कुशीतील ‘भुशी’ धरण ओसंडून (Bhushi Dam Overflows) वाहत आहे, तसेच परिसरातील धबधबेदेखील वाहू लागले आहेत. त्यामुळे येथील निसर्गरम्यता मनमोहक झालेली आहे. आता निसर्ग इतका बहरलाय म्हटल्यावर पर्यटक मागे कसे राहतील. विकएंड साजरा करण्यासाठी पर्यटक इथं गर्दी करतायेत. गेल्या वर्षी ‘भुशी’ धरण जून महिन्यामध्येच ओसंडून वाहत होते. पावसामुळे आधीच सुंदर असलेले लोणावळ्यातील निसर्गसौंदर्य अधिकच खुलून आले आहे. पावसाळ्यात शेकडो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असतात. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसळायला सुरुवात झाली आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Update: जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा)

दरम्यान लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण पाच दिवसातच ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातील अनेक पर्यटकांनी या ठिकाणी धाव घेतली आहे. भुशी धरण नेहमीच पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा प्रश्न राहिला आहे. तरुणांपासून ते लहाण मुलं आणि अगदी वृद्ध व्यक्ती देखील धो-धो पावसासह धरणातील पाण्यात भीजण्याचा आनंद लूटत असतात.

‘भुशी’ धरण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तरुणांपासून लहानांपर्यंत सर्वच पर्यटक येथे हजेरी लावत असतात. गर्दीची संभाव्यता लक्षात घेत लोणावळा पोलिसांनीदेखील वाहतूक कोंडीबाबत विशेष दक्षता घेतली आहे. दरवर्षी होणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यावेळी पोलीसांकडून जास्त सतर्कता बाळगण्यात येत आहे.