Maharashtra Rain Forecast: पुढील 5 दिवस राज्यात काय असेल पावसाची स्थिती? जाणून घ्या
Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

राज्यात पावसाचा जोर कमी होत असताना पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याने महाराष्ट्रभरातील पावसाची स्थिती काय असेल, याचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. तर राज्यात इतर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. 26-30 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पावसाची स्थिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (मागील 5 दिवस राज्यात पावसाची विश्रांती- IMD)

आज, 26 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सागंली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 27 ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी मेघर्गजनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

के. एस. होसाळीकर ट्विट:

28 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. 29 आणि 30 ऑगस्ट रोजी राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला. या वर्षी सामान्य पावसाचा अंदाज असूनही अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. दरड, भिंत कोसळणे अशा घटनाही अनेक घडल्या. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे.