मागील दोन-तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर आता काही दिवस पाऊस दडी मारणार आहे. पुढील 5 दिवस राज्यात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर पश्चिम किनारपट्टीवरील काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होणार आहे. (Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तवला अंदाज)
पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र पावसाच्या जा-ये च्या खेळामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात यंदा नंदुरबार, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या तर विविध जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे कुटुंब, संसार उद्धवस्त झाले. पीडितांसाठी सरकारकडून मदत करण्यात आली. तसंच अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पूरग्रस्तांना मोठी मदत पुरवली आहे.