राज्यात पावसाने उशीरा हजेरी लावली होती त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली, आता पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rain)हजेरी लावल्याने मराठवाडा (Marathwada) विभागातील अनेक भागात नद्या-नाल्यांना पुर आले आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील 6 जिल्ह्यातील 50 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 20 पैकी आठ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने आजही राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. (हेही वाचा - Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला, शेतकऱ्यांना दिलासा)
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे.
यंदा मराठवाड्यात सुरवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे विभागातील आठ पैकी 6 जिल्हे रेड झोनमध्ये गेले होते. मात्र, नांदेड जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. त्यात मागील तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने देखील नांदेड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.