महाराष्ट्रात हवामान खात्याने (Maharashtra Weather) पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुरूवारी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीचा मार्ग मोकळा झाला असून बळीराजा सुखावला आहे. मात्र येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर (Weather Updates) आणखीच वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा - Mumbai Lakes Water Level Today: मुंबईला पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा वाढला)
सध्या मुंबईसह उपनगर आणि ठाण्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. पुण्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तळकोकणात चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकरी पिकांची लागवड करत आहेत. अनेक ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली आहे. सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असतानाची काही दृश्य परेश कांबळी यांनी ड्रोनच्या माध्यमातुन टिपली आहेत. यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. जून महिन्यात तुरळक ठिकाणं सोडली तर अन्य ठिकाणी पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळं बळीराजा चिंतेत होता.