पंतप्रधान मोदींचे शिर्डी विमानतळावर स्वागत (Image Credit: ANI)

श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये शुक्रवारी (१९ ऑक्टोंबर) दाखल झाले. राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे शिर्डी विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी मंदिरात जाऊन साईबाबांच दर्शन घेतले. यानंतर आता ते सभेला संबोधित करणार आहेत.  शिर्डी साई संस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी ते शिर्डीत आले आहेत.

दरम्यान, काल (गुरुवार, १८ ऑक्टोबर) दसऱ्या दिवशी मुंबईत झालेल्या शिवसेना दसरा मेळावा तसेच, नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याबाबत पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नागपूर येथील आरएसएसच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने कायदा करावा असे म्हटले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेले साडेचार वर्षे आयोध्येत एकदाही का गेले नाहीत? असा सवाल उद्धव यांनी शिवाजी पार्कवरील मैदानातील मेळाव्यातून विचारला होता. (हेही वाचा, तिजोरीत खडखडाट तरीही, मोदींच्या कार्यक्रमासाठी २ कोटींचा चुराडा करण्याचा राज्य सरकारचा घाट)

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये कडेकोठ बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डी परिसराला पोलीसी छावणीचे स्वरुप आल्याचे पहायला मिळत आहे. १८ ऑक्टोंबर २०१८ रोजी साईबाबांच्या समाधीस १०० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने साई संस्थानच्यावतीने वर्षभर १ ऑक्टोंबर २०१७ ते १८ ऑक्टोंबर २०१८ या कालावधत शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. याच सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीत आले आहेत.