Mahrashtra Politics: शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेससह करणार महाराष्ट्राचा दौरा; Nana Patole यांची माहिती (Watch)
Nana Patole (PC - ANI)

राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे 1 जुलै रोजी शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी रविवारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मंगळवारी (4 जुलै) उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्षाची बैठक झाली, ज्यामध्ये शिवसेना (यूबीटी) महाविकास आघाडीचा भाग राहण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे पक्षाचे नेते अनंत गीते यांनी सांगितले.

दुसरीकडे, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील वाय.व्ही.चव्हाण केंद्रावर भेट घेतली. त्यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘महाराष्ट्रात आम्ही पवार साहेब, उद्धव साहेब मिळून महाराष्ट्रात दौरा आखत आहोत. पवार साहेब स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी बोलतील.’ लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या, लोकशाहीवर विश्वास न ठेवणाऱ्या, हुकूमशाही प्रवृत्ती असलेल्या भाजपसारख्या पक्षाला महाराष्ट्राच्या भूमीतून समूळ उखडून काढायचे आहे, हाच आमचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी आणि शिंदे गटाच्या शिवसेना-भाजप सरकारच्या विरोधात लढण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार छावणीने केला आहे. (हेही वाचा: Maharashtra Political Crisis: 'विश्वासघातकांनी परवानगीशिवाय माझा फोटो वापरू नये', राष्ट्रवादीचे संस्थापक Sharad Pawar यांचा इशारा)

दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती केली होती, मात्र आता काँग्रेसनेही या पदावर दावा मांडण्याचा विचार केला आहे. विरोधी पक्षनेतेपदावर कथित दावा करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबईतील विधानभवनात काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठकही झाली. राज्यात सध्या काँग्रेसचे 45 आमदार आहेत.