CM Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याबाबत नुकतीच पावले टाकली. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही तर सुरुवात आहे. आगामी काळात त्यांनी (ठाकरे) जर औवैसी यांच्या AIMIM पक्षाशी हातमिळवणीकेली तरी आश्चर्य वाटू नये. त्यांच्या पक्षाने मूल्यांपेक्षा पैशालाच अधिक प्राधान्य दिल्याचा आरोपीही शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे मात्र आपले सावकाश पावले टाकत ठाम निर्णय घेत आहेत. ते जराही आपल्या निश्चयापासून ढललेले दिसत नाही. समाजवादी पक्षांसोबतचे मतभेद हे प्रामुख्याने वैचारिक आहेत आणि लोकशाहीच्या हितासाठी चर्चेद्वारे ते सोडवले जाऊ शकतात यावर त्यांनी भर दिला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृततानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजवादी पक्षांसोबत युती करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांवर उघडपणे टीका केली आहे. अशा युतींना मतदारांचा विश्वासघात असल्याचे म्हणत शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात ते शिवसेना (UBT) आणि AIMIM यांच्यात युतीची होण्याची शक्यता वर्तवली. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर पक्षाच्या तत्त्वांपेक्षा पैशाला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. शिंदे यांनी म्हटले आहे की, त्यांना पक्षाच्या बँक खात्यातून 50 कोटी रुपये मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावरुच दिसतेकी, पक्षाची आपुलकी त्यांच्या राजकीय ध्येयापेक्षा आर्थिक स्त्रोतांवर जास्त आहे.

दरम्यान, शिंदे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांची एक बैठक नुकतीच आयोजित केली. शिवाय, त्यांनी जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, महिला आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आपली म्हणजेच "बाळासाहेब (ठाकरे) यांची खरी शिवसेना" असे सांगत शिंदे यांनी येत्या दसऱ्याला आझाद मैदानावर आझाद शिवसेनेची सभा होणार असल्याचेही म्हटले. शिवाय, शिवसेनेतील विविध गटांतील संघर्ष टाळण्यासाठी शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेणे बंद करण्याची घोषणा शिंदे यांनी केली.

दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षात जागावाटपावरुन धुसफुस सुरु असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागांवर दावा सांगितला आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपने मिशन 45 धोरण जाहीर केले आहे. त्याातच अजित पवार गटही महायुतीत आल्याने जागावाटपावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.