महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी वाढत आहेत. आधी हातून सत्ता गेली, त्यात आता पक्ष वाचवण्याची धडपड सुरू आहे. यामध्येही रोज नव नवीन ट्विस्ट येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता उद्धव ठाकरेंसमोर खासदारांबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठकीत हजेरी लावली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. विनायक राऊत, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत आणि ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांच्या आभासी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत 12 शिवसेना खासदार ऑनलाइन उपस्थित होते. विशेष म्हणजे यापूर्वीच शिवसेनेचे 55 आमदार दोन गटात विभागले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर 15 आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्याचवेळी आता शिंदे गटाने आपल्याकडे 12 खासदार येणार असल्याचा दावा केला आहे.
माध्यमांनुसार बैठकीला पुढील 12 खासदार उपस्थित होते-
सदाशिव लोखंडे – शिर्डी, राजेंद्र गावित - पालघर, श्रीकांत शिंदे - कल्याण डोंबिवली, राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई, कृपाल तुमाने – रामटेक, भावना गवळी -यवतमाळ, हेमंत गोडसे - नाशिक, हेमंत पाटील - हिंगोली, श्रीरंग बारणे - मावळ, संजय मंडलिक - कोल्हापूर, धैर्यशील माने - हातकणंगले, संजय जाधव – परभणी (हेही वाचा: पक्षविरोधी कारवायांसाठी उद्धव ठाकरे यांची रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांच्यावर कारवाई)
या 12 खासदारांच्या गटनेतेपदी भावना गवळी आणि प्रतोद पदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे लोकसभेत एकूण 18 खासदार आहेत. यातील 12 खासदारांनी उपस्थिती लावल्याने शिवसेनेचे लोकसभेतील केवळ 6 खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बराखास्त करून, नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.