शिवसेनेचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षासोबतची युती ही ‘नैसर्गिक आणि कायमस्वरूपी नाही’ तसेच एक वेगळ्या परिस्थितीमध्ये ती घडली, असे ते म्हणाले. महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपल्या पक्षाला याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप पटोले यांनी केला.
पटोले म्हणाले, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर शिवसेनेला परिषदेचे उपसभापतीपद देण्यात आले, त्यामुळे काँग्रेसला हे (विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते) पद मिळावे, असे आम्हाला वाटत होते. परंतु आमच्याशी सल्लामसलत न करता याबाबत निर्णय घेण्यात आला. याबाबत काँग्रेस शिवसेनेशी चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारवरही टीका केली आणि ते सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा केला. ‘केंद्रीय संस्था आणि निधी वापरून’ हे सरकार स्थापन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार स्थापन झाल्यानंतर 39 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महाराष्ट्राची परंपरा आहे की, खात्यांचे वाटप तत्काळ केले जाते. परंतु नव्या सरकारमध्ये अद्याप यावर एकमत नाही, त्यामुळे मंत्रिपदांसाठी लढा सुरू असल्याचे दिसून येते, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार मंगळवारी झाला आणि एकूण 18 आमदार- भारतीय जनता पक्षाचे 9 आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील उर्वरित 9 आमदारांनी एका मुंबईच्या राजभवनात भव्य समारंभात मंत्रिपदाची शपथ घेतली. (हेही वाचा: BJP Maharashtra: चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलारांकडे मुंबई भाजप अध्यक्ष पदाची कमान)
शपथ घेणारे भाजपचे आमदार- चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित आणि अतुल सावे. शिवसेनेकडून दादा भुसे, शंभूराजे देसाई, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे.