एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पक्षातील ही फूट टाळण्यासाठी किंवा शक्य तितकी कमी करण्यासा प्रचंड प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला हे बंडोबा अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आता आक्रमक धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामना संपादकीयामधूनही आज जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ही टीका बंडखोरांवर आहेच. त्यासोबतच ती भाजपवरही आहे. ' गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे', असा थेट हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

'गुवाहाटीमधील योगा शिबीर' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात सामनामध्ये म्हटले आहे की,'महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा 'योगराज' हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. एक मात्र नक्की, गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढ्याची तेजस्वी किरणे बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे'. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 2 तास चर्चा)

सामना संपादकीयात पुढे म्हटले आहे की, 'महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल हिंदुस्थानचे डोळे ज्याकडे लागले होते ते कार्य पूर्ण होताना दिसत आहे. सुरतच्या 'मेरिडिअन' हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले 'चिंतन' कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. गुवाहाटीस्थित 'रॅडिसन ब्लू' योग शिबिरात महाराष्ट्रातील चाळिसेक आमदारांचे सखोल चिंतन शिबीर सुरू आहे. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ''भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.'' आसामच्या योग शिबिरात जे चाळिसेक योगार्थी आहेत ते कोण आणि कोठून आले, ते आता अखिल हिंदुस्थानास समजले. शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ''भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.'' आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत. बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? कश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठ्या प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे. हिंदूंनी पलायन केले आणि जाताना भारतीय जनता पक्षाला शाप दिले. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार दिल्लीत असताना कश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागते, हीच काय तुमची महाशक्ती? पाकिस्तानला खरेच धडा शिकविला असता तर काश्मीरच्या भूमीत हिंदू रक्ताचे पाट वाहताना दिसले नसते, असा टोलाही शिसेनेने लगावला आहे.

'रॅडिसन ब्लू' या योग शिबिराचे दरवाजे-खिडक्या बंद आहेत. मोकळी हवा येत नाही आणि शिबिरार्थी झापडबंद अवस्थेत पडले आहेत. त्यामुळे कश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. योग शिबिरातील आमदारांना अन्नातून अफू-गांजा मिसळून दिला जात असावा आणि त्याच गुंगीत आणि धुंदीत ते बोलत आणि डोलत आहेत असे दिसते. भाजप ही महाशक्ती वगैरे असल्याचे ज्यांना आता नव्याने उमजू लागले, त्यांनी कश्मिरी पंडितांच्या हत्येचा जाब गुवाहाटीच्या योग शिबिरातच विचारायला हवा, पण एका अर्थाने भाजप म्हणजे खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे 'ईडी-पीडी' बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले. भारतीय जनता पक्षाचा उल्लेख महाशक्ती असा केला ते खरेच आहे. काही जणांची 'ईडी-पीडी' त्यांनी दूर केली. तसेच काही जणांना 'ईडी'ची पीडा होईल असे सांगून गुवाहाटीच्या योग शिबिरात जबरदस्तीने भरती केले. त्यामुळे तेथे नक्की कोणत्या प्रकारचे योग सुरू आहेत त्याची कल्पना यावी. मोदी आपले आदरणीय पंतप्रधान आहेत. योग प्रचारात त्यांचे मोठेच योगदान आहे. अनेकदा ते केदारनाथास जाऊन ध्यान व चिंतन करतात, पण गुवाहाटीचे ध्यान व चिंतन वेगळे आहे. गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे व भाडोत्री लोकांना पकडून त्यांच्या तोंडून स्वतःच्या 'महान'पणाचा गजर करून घेत आहेत, असाही हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.