महाराष्ट्रात सत्तांतराच्या नाट्यादरम्यान आणि नंतरही अनेक राजकीय धक्के पाहिले आहेत. अजूनही हे सत्र संपलेले नाही. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सहभागी होणं हे मान्य नसल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदार बाहेर पडले आहे. त्यांच्यापाठोपाठ अनेक भागातून पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा पाठिंबा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळत असल्याने शिवसेना आणि शिंदेसेना असे दोन गट पहायला मिळत आहेत. पण आता लवकरच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी चर्चेसाठी भेटणार असल्याचं ट्वीट दीपाली सय्यद (Deepali Sayad) यांनी केल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलेले आहे.
दीपाली सय्यद यांनी दोन ट्वीट्स केली आहेत. त्यामध्ये शिवसैनिकांची भावना लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. यामध्ये भाजपा नेत्यांनी मध्यस्थी केल्याचंही त्यांनी नमूद केल्याने आता अनेकांचं या भेटीकडे लक्ष लागलं आहे. तर दुसर्या ट्वीट मध्ये 50 आमदार मातोश्रीवर दिसावेत सोबतच आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.
दीपाली सय्यद ट्वीट
@Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma
— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील. @ShivSena @mieknathshinde
— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
दीपाली सय्यद यांनी गुरू पौर्णिमेदिवशी मातोश्री वर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये संवाद व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं तसेच यासाठीच एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं त्यांनी मीडीयाशी बोलताना सांगितलं होतं.
अनेक शिवसेना खासदार, आमदार यांच्याकडून महाविकास आघाडीत शिवसेनेचं खच्चीकरण होत असल्याची, सामान्य शिवसैनिकाची कुचंबणा होत असून पक्षाला नुकसान होत असल्याची भावना बोलून दाखवली होती पण मातोश्री वर आणि ठाकरे कुटुंबांवर वैयक्तिक हल्ले करणार्या भाजपा नेत्यांच्या सोबत आणि शिवसेना पक्ष संपवायला निघालेल्या भाजपा सोबत जाण्यास तयार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवले आहे.