Maharashtra Police Officer Transfer: राज्य पोलीस दलातील 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे पाटील, मिलिंद भारंबे यांच्यासह पाहा कोणाची कुठे नियुक्ती
Maharashtra Police | (File Photo)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. राज्य पोलीस दलातील (Maharashtra Police Officer Transfer) 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ठाकरे सरकारने केल्या आहेत. राज्य सरकार पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार असल्याची चर्चा आगोदरपासूच सुरु होती. मात्र, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गणेशोत्सव 2020 पार पडेपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नयेत, अशी भूमका घेतली होती. त्यामुळे या बदल्या काहीशा लांबणावर पडल्या होत्या.

राज्यभरात काल (1 सप्टेंबर 2020) गणेश विसर्जन पार पडले आणि गणेशोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (बुधवार, 2 सप्टेंबर 2020) राज्य पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. या आदेशानुसार राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी (40) यांच्या बदल्या झाल्या आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था तर मिलिंद भारंबे यांची गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे बदली होण्यापूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बिपीन कुमार सिंह यांची बदली करण्यात आली आहे. तर पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली आहे. (हेही वाचा, विश्वास नांगरे पाटील यांच्या हाती मुंबई सहआयुक्त पदाची सुत्रं; नाशिकचे आयुक्तपद दीपक पांडे यांच्याकडे सुपूर्त)

बहुचर्चीत अधिकारी असलेल्या कृष्णप्रकाश यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी यांची नियुक्ती झाली आहे. दीपक पांडे यांना नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करणयात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीमुळे नाशिकचे पोलीस आयुक्त पद रिक्त झाले होते.

मनोजकुमार लोहिया यांना कोल्हापूर महानिरीक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांना अमरावतीच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की, पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची नियुक्ती झाली आहे.