Maharashtra Police Bharti 2024: मुसळधार पावसामुळे मीरा-भाईंदर-वसई विरार भागातील शारीरिक क्षमता चाचणी पुढे ढकलली; स्टेडियम वॉटरप्रूफिंगचे प्रयत्न सुरू
Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024: आज, 19 जून पासून महाराष्ट्र पोलीस दलातील 17 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया (Police Force Constable Recruitment) सुरु झाली आहे. या पदांसाठी तब्बल 17, 76, 256 अर्ज आले आहेत. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी अशा तीन टप्प्यात ही भरती होणार असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये उमेदवारांची निवड पूर्ण होईल. मात्र आता राज्यात कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मैदाने पाण्याने भरली आहे. अशात ही मैदाने चाचणी घेण्यायोग्य नसल्याने काही ठिकाणी पद भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

आता मीरा-भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलीस दलातील कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतील शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी, पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे. शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अधिकाऱ्यांना 26 जून रोजी चाचणीचे वेळापत्रक पुन्हा निश्चित करावे लागले.

ही मैदानी चाचणी 19 ते 25 जून दरम्यान भाईंदर (पश्चिम) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर होणार होती. मुसळधार पावसामुळे स्टेडियमचे रनिंग ट्रॅक आणि इतर भाग जलमय झाले आहेत. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त- श्रीकांत पाठक म्हणाले की, ‘आम्ही ट्रॅक वॉटरप्रूफ केले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्याने नुकसान झाले. पावसाचे पाणी स्टेडियमच्या आवारात जाऊ नये यासाठी जेसीबी आता सेवेत लावण्यात आले आहेत. (हेही वाचा: Auto-Taxi Drivers Welfare Corporation: महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी खुशखबर; सरकार स्थापन करणार कल्याणकारी महामंडळ, जाणून घ्या मिळणारे लाभ)

पहा व्हिडिओ- 

मात्र दस्तऐवज पडताळणी आणि उपस्थित उमेदवारांची शारीरिक मानक चाचणी (उंची, छाती आणि वजन मोजमाप) यासह प्रक्रिया पूर्ण झाल्या. पहिल्या बॅचमध्ये सुमारे 650 उमेदवारांचा समावेश होता, त्यापैकी जवळपास 460 उमेदवारांनी बुधवारी आपला सहभाग नोंदवला. मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस दलात 231 कॉन्स्टेबलच्या भरतीच्या मोहिमेसाठी, 1,523 महिलांसह एकूण 8,423 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. प्रत्येक पदासाठी सरासरी 36 अर्जदार स्पर्धा करत आहेत.