Rickshaw-Taxi (Photo credit - file)

Auto-Taxi Drivers Welfare Corporation: महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या (Auto-Taxi Drivers) कल्याणासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यात 'महाराष्ट्र टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ' (Maharashtra Autorickshaw and Taxi Drivers Owners Welfare Corporation) स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. याद्वारे रिक्षाचालक, टॅक्सी चालक आणि मालकांना शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

या महामंडळाअंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल. चालकाला तसेच त्यांच्या कुटूंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल.

अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार देण्यात येतील. मुलांना शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना तंत्रकुशल केले जाईल. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल. तसेच 63 वर्षांवरील चालकांना ग्रॅज्युईटी मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी चालकाला प्रतिवर्ष 300 रुपये म्हणजेच दरमहा 25 रुपये मात्र जमा करावे लागतील आणि उर्वरित रक्कम सरकार देईल. (हेही वाचा: Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया आजपासून राज्यभरात सुरु; जाणून घ्या तपशील)

पहा पोस्ट- 

येत्या काही दिवसांत या महामंडळाची रचना अंतिम केल्यानंतर परिवहन विभागाच्या कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी उघडण्यात येणार आहे. या ठिकाणी रिक्षा-टॅक्सी चालकांना या महामंडळाच्या फायद्याची माहिती दिली जाईल. दरम्यान, जर्मन कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ महाराष्ट्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासोबतच सरकारने जर्मन सरकारसोबत 400,000 कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा करार केला असून, त्याअंतर्गत कुशल ड्रायव्हर्सना परदेशी नोकऱ्यांवर जाण्याची संधी मिळणार आहे.