गेल्या 48 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 140 जणांना कोरोनाची लागण तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, COVID19 च्या संक्रमितांचा आकडा 3,960 वर पोहचला
Maharashtra Police | (File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडताना सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. कोरोनाबाधित रुग्णांवर राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी अहोरात्र उपचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. याच दरम्यान आता गेल्या 48 तासात महाराष्ट्रातील पोलीस दलातील नव्याने 140 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच एका कर्मचाऱ्याचे निधन झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलीस दलात आतापर्यंत एकूण 3960 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2925 जणांची प्रकृती सुधारली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच कोरोनाबाधितांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटर्सची उभारणी सरकारकडून करण्यात येत आहेत. संशोधकांकडून सुद्धा कोरोना व्हायरसवरील लसीचा शोध घेतला आहे.(मुंबई पोलिस दलाने गमावला अजून एक कोव्हिड योद्धा; Mumbai Police मधील कोरोनामुळे बळींचा आकडा 31!)

तसेच महाराष्ट्रात पोलीस दलातील COVID19 चे एकूण 986 अॅक्टिव्ह कर्मचारी असून 46 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी एकाच दिवशी सर्वाधिक 3827 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तसेच 142 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,24,331 वर पोहचला आहे. राज्यात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनलॉक नुसार नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे.