Mumbai Police| Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबई, महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरात भारतवासीयांचा कोरोना (Coronavirus) विरूद्ध मागील 3 महिन्यांपासून लढा सुरू आहे. दरम्यान या वॉर व्हर्सेस व्हायरस स्थितीमध्ये आरोग्य यंत्रणेइतकेच आघाडीवर मुंबई पोलिस (Mumbai Police) देखील उभे राहून लढत आहेत. मुंबई शहरात चोख नाकाबंदीसाठी मुंबई पोलिस नाक्या-नाक्यावर उभे आहेत. अशामध्ये त्यांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक आहे. काल (19 जून) अजून एका पोलिस दलातील कर्मचार्‍याचे कोरोना व्हायरसशी लढताना प्राण गेले आहेत. सध्या शहरात कोरोनाची लागण झालेल्या मुंबई पोलिस कर्मचार्‍यांची संख्या 2349 पर्यंत पोहचली आहे. तर मृतांचा आकडा 31 आहे.

मुंबई पोलिस दलात कर्मचार्‍यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 55 वर्षावरील लोकांना भर पगारी रजा देण्यात आली आहे. तर 50 पेक्षा अधिक वय आणि हृद्यविकार, मधुमेहासारखे आजार असलेल्यांना नाकाबंदीच्या ड्युटीपासून दूर ठेवले आहे. Covid-19 Helplines for Mumbai Police Personnel: मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष कोविड-19 हेल्पलाईन नंबर्स जारी; रुग्णवाहिका, कोविड-19 संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास सक्रिय.

भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई शहर आघाडीवर आहे. दरम्यान 30 जून पर्यंत देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असला तरीही आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही प्रमाणात संचारबंदीच्या नियमांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी वर्दळ सुरू झाली आहे.

ANI Tweet

मुंबई शहरामध्ये काल 1269 नवे रुग्ण आढळले असून शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 64,068 वर पोहोचली आहे. तर मुंबईत 28,388 रुग्णांवर उपचार सुरु असून 32,257जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली आहे. मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळत असले तरीही धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन करण्यात आलं आहे.