मुंबई येथे वांद्रे-वरळी सी लिंकजवळ 'मुंबई आय' उभारण्यात येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती
London Eye ( Photo Credit: Wikimedia Commons)

लंडन येथील लंडन आय प्रमाणे मुंबईतही (Mumbai) मुंबई आय (Mumbai Eye) उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी दिली आहे. आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना थेट 800 फूट उंचीवरून मुंबईचे विहंगममय दृष्यांचा आनंद लुटता येणार आहे. याआधीही 4 वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचा वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्डजवळील 14 हजार स्केअर मीटर जागेवर मुंबई आय उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. महापालिकेच्या प्रस्तावानुसार या मुंबई आयची उंची 630 मीटर इतकी होती. तसेच हा जगातील सर्वात उंच पाळणा ठरला असता. मात्र, पुरेशा निधीअभावी हा प्रस्ताव बास्तनात गुंडाळण्यात आला.

नुकतीच राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ हे 'मुंबई आय' साकारण्यात येणार आहे. वांद्रे येथे सी लिंक सुरू होताना टोल नाक्याजवळ असलेल्या जागेवर 'मुंबई आय' साकारण्यात येणार आहे. तसेच सीआरझेडसह इतर परवारवानगीबाबत अडचण निर्माण न झाल्यास याच ठिकाणी 'मुंबई आय' उभारण्यात येणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, “जगप्रसिद्ध ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईच्या पर्यटनात मोलाची भर टाकेल अशी ‘मुंबई आय’ इमारत उभारण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्याला सर्वांनी सहमतीही दर्शवली", असे अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची शंभर फुटांनी वाढविण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अजित पवार यांची माहिती

लंडन आय म्हणजे काय?

'लंडन आय' हा मोठ्या आकाराचा आकाश पाळण्यासारखा आहे. थेम्स नदीच्या काठावर 'लंडन आय' उभारण्यात आले असून जगभरातील पर्यटकांमध्ये याचे आर्कषण आहे. 'लंडन आय'ची उंची ही 135 मीटर असून 31 डिसेंबर 1999 रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. दरवर्षी 'लंडन आय'ला जवळपास 35 लाख पर्यटक भेट देतात.

पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध लंडन आय या इमारतीच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे मुंबईचे सौदर्य पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या आनंदात भर पडणार आहे. मुंबई आय च्या कामाला कधीपासून सुरूवात होईल, याची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.