येत्या एका महिन्यात दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज (27 जून) केली आहे. त्यावेळी रामदास कदम विधानसभेत बोलत होते. दुधाची पिशवी विकत घेताना 50 पैसे डिपॉझिट घ्यायचे. तर तिच दुधाची पिशवी परत केल्यास पुन्हा 50 पैसे परत द्या ही योजना सर्व दुध कंपन्यांनी मान्य केली आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे ही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
राज्यात 23 जून 2018 रोजी प्लास्टिक बंदी करण्यात आली. मात्र तरीही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास केला जात आहे. तर अद्यापही दुधासाठी प्लास्टिकच्या पिशव्याच्या वापर केला जात आहे. राज्यात 12 हजार टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत होता. परंतु प्लास्टिकवर बंदी आणल्यानंतर त्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र प्लास्टिक हे बाहेरील विविध राज्यातून येत असल्याने प्रामुख्याने 80 टक्के प्लास्टिक गुजरात येथून येत असल्याचे रामदास कदम यांनी विधानसभेत म्हटले आहे.(हेही वाचा-मुंबईत प्लास्टिक बंदी केल्यावरही सर्रास वापर सुरु, आतापर्यंत महापालिकेकडून 3 कोटीपेक्षा जास्त दंड वसुली)
तर नुकत्याच 25 जून पर्यंत प्लास्टिक बंदी केल्यानंतर जवळजवळ 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दंडाची वसूली करताना 61851.429 किलोचे प्लास्टिक जमा केले आहे.