Maharashtra Monsoon 2019 Updates: महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; विदर्भ, मराठवाडा भागात दमदार पावसाची शक्यता
Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

मुंबईमध्ये पावसाचा जोर मागील काही तासांमध्ये थोडा मंदावला असला तरीही आज (26 जुलै) दिवसभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या बंगालच्या उत्तर खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेने सरकत असल्याने महाराष्ट्रामध्ये पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ञांनी वर्तवला असल्याची माहिती स्कायमेट कडून देण्यात आली आहे. 23 जुलैपासूनचा मुंबई, कोकण, गोवा या पश्चिम किनारपट्टीवर वार्‍याचा जोर वाढला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भ या भागाला दिलासा मिळणार का? ही चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील भाग अद्याप पावसाच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. जुलै महिना सरत आला तरीही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणारे शेतकरी आणि सामान्य चिंतातूर झाले आहेत.

मुंबईमध्ये मागील 24 तासांत कुलाबा वेधशाळेत 52 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझमध्ये 38 मि.मी.पावसाची नोंद झाल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. हवामान खात्याने 28 जुलै पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.