Representational Image (Photo Credits: PTI)

कोविड-19 संकटामुळे (Covid 19 Pandemic) बंद असलेल्या राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे आता महाविद्यालयांबाबत (Colleges) कधी निर्णय घेणार? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनांत उपस्थित झाला आहे. यासंदर्भात राज्याते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दिवाळीनंतर महाविद्यालयं सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी अशी माहिती दिली.

महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आलेली असून दिवाळीनंतर ती सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंकडूनही महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात अहवाल मागवला आहे. परंतु, या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे उदय सामंत म्हणाले.

दरम्यान, राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागांत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. यामुळे शाळा नेमक्या कधी सुरु होणार, या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र महाविद्यालयं सुरु होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Schools Reopen in Maharashtra: राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु; शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह पालकांनाही करावे लागणार 'या' नियमांचे पालन)

राज्यातील महाविद्यालयं 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा मानस असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी सांगितले होते. तर टप्पाटप्प्याने महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. यासाठी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 2 ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्याबाबतही ते म्हणाले होते. दरम्यान, येणाऱ्या पुढील काळात याबाबत स्पष्टता येईल.