राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी मंगळवारी सांगितले की, 1% पेक्षा कमी साप्ताहिक कोविड पॉझिटिव्हिटी रेट किंवा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी दर असणाऱ्या जिल्ह्यांसाठी निर्बंध शिथिल करण्यासाठी एक नवीन रणनीती तयार केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीसाठी या आठवड्यात हा प्रस्ताव सादर केला जाईल, असेही ते म्हणाले. जास्त साप्ताहिक सकारात्मकता दर असणाऱ्या जिल्ह्यांना वगळता उर्वरित ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यास अनुमती दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे व्यवसाय आणि आर्थिक दळणवळणात वाढ होऊ शकेल. सध्या बहुतेक सर्व जिल्हे हे लेव्हल-3 च्या निर्बंधाखाली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला हा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. या आठवड्यात हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर त्याला मुख्यमंत्र्यांकडून अंतिम मंजुरी मिळेल. संपूर्ण लसीकरण हेदेखील शिथिलता आणण्याचे महत्त्वाचे निकष असेल, असे टोपे म्हणाले. असे 13-14 जिल्हे आहेत जिथे साप्ताहिक सकारात्मकता दर 0.1%-0.9% आहे. अशा जिल्ह्यांमध्ये नक्कीच निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे.
टोपे म्हणाले, 'आम्ही एक विस्तृत रूपरेषा सादर केली आहे आणि स्थानिक परिस्थितीच्या आधारे, जिल्हे त्यांच्या साप्ताहिक सकारात्मकता दराचे मूल्यांकन करून निर्णय घेऊ शकतात. हा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. मात्र निर्बंध शिथिल झाल्यावर कोविड प्रोटोकॉलचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
दुसरीकडे मंत्री अस्लम शेख म्हणाले की, ‘चार महिन्यांपूर्वी लागू केलेले निर्बंध हळू हळू शिथिल केले गेले आहेत. आमच्या मंत्र्यांना असे वाटत आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच रेस्टॉरंट्समधील वेळही वाढवणे आवश्यक आहे. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.’