गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामधील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू सकारात्मक दर कमी आहे, त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात यावेत अशी मागणी जोर धरत होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले होते की, 1% पेक्षा कमी साप्ताहिक कोविड पॉझिटिव्हिटी रेट किंवा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी दर असणाऱ्या जिल्ह्यांमधील नियमांमध्ये ढील दिली जाऊ शकते. त्यानुसार आता राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, तर उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये सध्या सुरु असलेले निर्बंध कायम राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या 25 जिल्ह्यांमध्ये सध्या लेव्हल 3 चे निर्बंध चालू आहेत, यामध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. अशाप्रकारे या जिल्ह्यामधील जनतेला दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे इथल्या आर्थिक बाबींना वेग येणार आहे.
निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानंतर-
दुकाने, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरु केली जाऊ शकतात.
दुकाने शनिवारीसुधा चालू राहण्याची शक्यता आहे.
सिनेमा हॉल्स, मॉल्स 50 टक्के क्षमतेने सुरु होऊ शकतील.
लग्न समारंभांमध्येही लोकांच्या संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यामधील निर्बंध शिथिल –
परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुंबई, जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक (हेही वाचा: पूरग्रस्तांना त्वरित दिलासा! शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपयांची मदत जाहीर; उद्यापासून खात्यावर जमा होणार रक्कम)
या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम –
ज्या 11 जिल्ह्यांमधील निर्बंध कायम आहे त्यामध्ये, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे या जिल्ह्यांमधील परिस्थिती अजून ढासळली तर इथले निर्बंध अजून कडक करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
यासह, कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतल्यांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा मिळावी यासाठी टास्क फोर्सने शिफारस केली आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे.