CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या (Flood Hit People) नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी पूरग्रस्तांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे नुकसान भरपाई पॅकेज सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कुटुंबाला तातडीने दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पुराचा 7 जिल्ह्यातील 1,381 गावांना फटका बसला आहे, तर तब्बल 4.35 लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाने याआधीच मदत देण्याच्या उपाययोजनांची घोषणा करणे अपेक्षित होते परंतु झालेल्या नुकसानीची पूर्णतः माहिती नसल्यामुळे निर्णय होऊ शकला नाही.

पूरग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक कुटूंबाला दहा हजार रुपये रोख देईल. ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून पाच हजार रुपये दिले जातील. सोमवारी याची घोषणा करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांनाही मदत दिली जाईल.’ मदत रक्कम देताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

उद्यापासून 10 हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रशासनाला तातडीने पंचनामे करून आठ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांपेक्षा वर्धित नुकसान भरपाई देण्याचा निर्णय नुकसान भरपाईबाबत पंचनामे झाल्यानंतर दोन आठवड्यात घेण्यात येईल.

(हेही वाचा: महाराष्ट्रात पुरामुळे तब्बल 4000 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज, 209 जणांचा मृत्यू; NCP करणार 16,000 कुटुंबांना मदत)

निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीस वर्धित नुकसान भरपाई देण्यात आली आहे. एनडीआरएफच्या मानदंडांपेक्षा 50-80 टक्के जास्त मदत देण्यात आली आहे. राज्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या मृत्युनाची संख्या बुधवारी 213 वर पोहोचली. बहुतांश ठिकाणी शोध आणि बचावकार्य बंद करण्यात आले आहे, परंतु अद्याप आठ जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत व पुनर्वसन विभागाने राज्य मंत्रिमंडळात नुकसानीबाबतचा अंदाज व्यक्त केला, त्यानुसार या पुरामुळे 4000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.