Maharashtra Legislative Assembly election, 2019: अद्याप फॉर्म्युल्यावर चर्चा झाली नाही. कोणाची ताकद किती हाही विषय नाही. पण, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (Congress-NCP Alliance) सत्तेत येईल आणि मुख्यमंत्रीही आघाडीचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्यांची प्राथमिक बैठक आज (16 जुलै 2019) पार पडली. या बैठकीनंतर बाळासाहेब थेरात बोलत होते.
आजच्या बैठकीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
या वेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आजच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कोणत्याच फॉर्म्युल्यावर चर्चा झाली नाही. मात्र, राज्याच्या सत्तेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्रीच बसवायचा यावर दोन्ही पक्ष नेत्यांचे एकमत झाले, असे सांगतानाच कोणाची ताकद किती हा विषय नाही. पण, विधानसभा निवडणुकीनंत राज्यात आघाडीचेच सरकार सत्तेत येणार, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, रावासाहेब दानवे यांच्यानंतर चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबईची जबाबदारी)
दरम्यान, या वेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या कुणाला बरोबर घ्यायचं याबाबत निर्णय झाला नाही. याबाबत पुढे निर्णय घेतला जाईल. तसेच, मनसे या पक्षाला सोबत घ्यायचे किंवा नाही याबाबतही अद्याप चर्चा झाली नाही, असेही थोरात म्हणाले.
या वेळी थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबद्दलही मत व्यक्त केले. थोरात म्हणाले, विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना तिकीट देताना जिकणाऱ्या किंवा जिंकण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल, असेही थोरात यांनी सांगितले.