रावासाहेब दानवे यांच्यानंतर चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबईची जबाबदारी
Chandrakant Patil, Raosaheb Danve, Mangal Prabhat Lodha

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र भाजपामध्ये आज (16 जुलै 2019)  महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. या बदलानुसार चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) हे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. तर, मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याकडे मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना दानवे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी कामगिरी समाधानकारक राहिली.  पक्षाची घटना आणि धोरण पाहता एक व्यक्ती एक पद हे आमच्या पक्षाचे धोरण आहे. तसेच, पक्षाच्या घटनेनुसार एकाच व्यक्तीला सलग तीसऱ्यांदा एकाच पदावर खास करुन प्रदेशाध्यक्षपदावर राहता येत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन मी माझा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

दरम्यान, मी माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यापूर्वी मी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांना भेटलो. संघटनमंत्र्यांना भेटलो आणि विनंती केली की, मला आता केंद्रात मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मला आगोदरच्या जबाबदारीतून (प्रदेशाध्यक्ष ) मुक्त करा, अशी विनंत केली. ही विनंती मान्य झाल्यानंतरच मी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचेही रावसाहेब दानवे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार विधानसभा निवडणूक, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू; गिरीश महाजन यांची माहिती)

दरम्यान, रावसाहेब दानवे हे केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए 2 सरकारमध्ये मंत्री झाल्यापासूनच महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदल केले जातील अशी, शक्यता वर्तवली जात होती. राजकीय वर्तुळात तशी चर्चाही रंगली होती. मात्र, केंद्रातील सरकारपचा शपथविधी झाल्यावर काही काळ उलटून गेला तरी संघटनात्मक बदल दिसले नव्हते. त्यामुळे ही चर्चा काहीशी कमी होत गेली होती. दरम्यान, पक्षनेतृत्वाने अचानक हा निर्णय जाहीर केला.