राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार विधानसभा निवडणूक, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू; गिरीश महाजन यांची माहिती
गिरीश महाजन (Photo Credit : Maharashtra Information Centre)

लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2019) मोर्चेबांधणी सुरु आहे. पराभवाने खचून न जाता कॉंग्रेस आता उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशात विधानसभा निवडणुकांच्या तारखांचा अंदाज समोर आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू शकते असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 जुलै) नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. त्यानंतर महाजन यांनी हा अंदाज वर्तवला.

येत्या 10 किंवा 15 सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. त्यानुसार 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक पार पडेल असे गिरीश महाजन म्हणाले. याआधी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील, येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील असे सांगितले होते. आता महाजन यांचेही तेच भाकीत पाहता या तारखांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. (हेही वाचा: राज्यात 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणूक; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली शक्यता)

गिरीश महाजन यांनी हा अंदाज 2014 च्या निवडणूक तारखांवरून लावण्यात आल्याचे सांगितले आहे. तारखा काहीही असो कॉंग्रेसच्या पराभवामुळे या निवडणुकांचे महत्व फार वाढले आहे. त्यात कॉंग्रेस कशाप्रकारे जादूची कांडी फिरवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक झाली. महाजन यांनी बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा देत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 50 आमदारांचा आकडा पार करुन दाखवावा, असे आव्हानही दिले आहे.