Maharashtra Legislative Assembly Election 2019 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Legislative Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पार पडेल असा अंदाज राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वर्तवला आहे. तसेच, या निवडणुकीची आचारसंहिता 15 सप्टेंबर पासून लागेल असेही ते म्हणाले. सन 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. या वेळीही ऑक्टोबर महिन्यातच विधानसभा पार पडतील, अशी शक्यात पाटील यांनी वर्तवली.

येत्या 9 नोव्हेंबर 2019 रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे साधारण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका पार पडू शकतात. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती जोरदार कामाला लागली आहे. या पार्श्वभुमीवर भाजपची एक बैठक मुंबई येथे शनिवारी पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक: ३ राज्यांमध्ये काँग्रेसपुढे कडवं आव्हान)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेला धक्कादायक पराभव स्वीकारत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षही कामाला लागले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकिंचाही धडाका उडाला आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष युती करुन विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकमेकांशी हातमिळवणी करत आघाडी करुन निवडणूक लढण्याचे नक्की केला आहे.