प्रातिनिधिक प्रतिमा (Image: PTI)

राज्यात दुष्काळाचे सावट आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तरीही सरकारकडून यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. याच मुद्द्यावरून आता अखिल भारतीय किसान सभा सरकार विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. म्हणूनच 2 नोव्हेंबरला किसान सभेकडून राज्यभरात निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ऊसाला किमान 3500 रुपये दर द्यावा, शेतकऱ्यांना जमिनीवरून उठवणारी बुलेट ट्रेन रद्द करावी, दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन असणारा आहे.

या पहिल्या आंदोलनाव्यतिरिक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातही आंदोलन होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मुंबईत 15 नोव्हेंबरला राज्यव्यापी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या देशात भाजपचे सरकार आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना नेहमीच दुर्लक्षित करत आले आहे. यामुळेच या परिषदेला भाजपसोडून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे.

तिसरे आंदोलन हे फारच व्यापक असून राजधानी दिल्लीमध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे. 28 ते 30 नोव्हेंबर दिल्लीमध्ये पायी किसान मोर्चाद्वारे हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातल्या 180 शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे नवले यांनी सांगितले.