कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavraj Bommai) यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत दिल्यानंतर, 6 डिसेंबरला होणारा चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन समन्वय मंत्र्यांचा बेळगावचा दौरा (Belgaum Visit) रद्द करण्यात आला आहे. हा दौरा रद्द झाल्याने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेने सोमवारी खेद व्यक्त केला. मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजप आणि शिंदे कॅम्प या दोघांनी सांगितले.
आधी हे दोन्ही मंत्री 3 डिसेंबरला भेट देणार होते, परंतु बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 हून अधिक गावांवर तसेच सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्यानंतर हा दौरा 6 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आला होता. हे मंत्री मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी कर्नाटकसोबतच्या अनेक दशकांच्या सीमावादावर चर्चा करणार होते.
कर्नाटकशी राज्याच्या सीमा वादात समन्वय साधण्यासाठी नेमलेल्या मंत्र्यांनी वादग्रस्त भागांना भेटी द्याव्यात की नाही याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते, ‘आम्ही स्वतंत्र देश असल्यामुळे कोणालाही एखाद्या ठिकाणी जाण्यास रोखू शकत नाही. मात्र वादग्रस्त भागाशी संबंधित खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे आणि आम्हाला या प्रकरणातील पुढील गुंतागुंत टाळायची आहे.’ (हेही वाचा: मुंबईमध्ये 17 डिसेंबरला महाविकास आघाडी काढणार महामोर्चा; Uddhav Thackeray यांची घोषणा)
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपण आणि चंद्रकांत पाटील बेळगाव दौऱ्याबाबत निर्णय घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. दरम्यान, हा दौरा रद्द झाल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी विचारले, ‘हा यू टर्न का? सरकारला महानिर्वाण दिनाची माहिती नव्हती का? भेटीची घोषणा करण्यापूर्वी त्यांना शांतता भंगाची जाणीव नव्हती का? ‘सत्य हे आहे की, बोम्मईच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र सरकारने हा दौरा रद्द केला आहे.’