गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमा विवाद (Maharashtra-Karnataka Border Row) चालू आहे. नुकतेच कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही राज्यातील बस सेवाही काही काळासाठी थांबवण्यात आली होती. हा वाद चिघळत असताना, आता दोन्ही राज्यांमधील सीमावाद सोडवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा हे 14 डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी सांगितले.
महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने शहा यांची भेट घेतल्यानंतर शिरूरचे लोकसभा सदस्य कोल्हे पत्रकारांशी बोलत होते. बैठकीदरम्यान, एमव्हीए शिष्टमंडळाने शाह यांना सांगितले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा विवाद अशा पातळीवर पोहोचला आहे की, त्याचे रूपांतर हिंसाचारात होऊ शकते. त्यानंतर शाह यांनी 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांकडून होणाऱ्या आक्रमक वक्तव्यांवर नियंत्रण ठेवायला हवे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणू शकतात. कर्नाटकात महाराष्ट्रातील ट्रकच्या तोडफोडीवर, ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे निर्देश देऊ शकतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत दोन्ही पक्षांना संयम बाळगण्यास सांगू शकतात.
केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अमित शहांसोबतच्या बैठकीत आम्ही त्यांना राज्यपाल कोश्यारी आणि भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचीही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी हा मुद्दा चांगलाच समजून घेतला आहे. गुजरातमध्ये शपथ घेतल्यानंतर या वादावरही सर्वांशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Maharashtra-Karnataka Border Row: कर्नाटकच्या बसेसला काळे फासले, लिहिले ‘जय महाराष्ट्र’; MNS चे आंदोलन)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उल्लेख करत खासदारांनी अमित शहा यांना सांगितले की, ते सतत महाराष्ट्राच्या आदर्शांचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले होते. अमित शहांना भेटायला जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी माविआच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती.