Maharashtra-Karnataka Border Dispute: कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुनावले; सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्याचाही सल्ला
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी (Laxman Savadi) यांना चांगलेच सुनावले आहे. असे येडे बरळत असतात. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ते काय बोलतात याने आम्हाला फरक पडत नाही. मात्र त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या (Maharashtra-Karnataka Border Dispute) प्रश्नाचा अभ्यास करावा, असा सल्लाही संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. मुंबई कर्नाटकमध्ये येत नाही तोपर्यंत तो भाग केंद्र शासित करावा असे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या वक्तव्यावर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सीमावाद सुरु आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. प्रकरण न्यायालयात आहे. जोपर्यंत हा वाद सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रवेश करवा अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक अजब तर्कट मांडले आहे. सावदी यांनी म्हटले आहे की, बेळगावचे राहू देत, मुंबई हीसुद्धा कर्नाटकचा भाग आहे. त्यामुळे मुंबई जोपर्यंत कर्नाटकचा भाग होत नाही तोपर्यंत ती केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करावी अशी मुक्ताफळे उधळली होती.

लक्ष्मण सावदी यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले की, कर्नाटकच्या नेत्यांनी इतिहास समजून घ्यावा. मुंबईमधील कोणत्याही कानडी बांधवांवर मराठीची सक्ती केली जात नाही. इथे अनेक कानडील शिक्षणसंस्था, संस्था आहेत. अनेक नागरिक आहेत. त्यांच्यावर आम्ही सक्ती करत नाही. अशी स्थिती बेळगावमध्ये आहे का? याचा विचार करावा. ही लढाई आपली भाषा आणि संस्कृती वाचविण्याासाठी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेली बैठक ही सीमाप्रश्नावरची निर्णायक बैठक होती. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही संजय राऊत यांनी या वेळी दिला. (हेही वाचा,Maharashtra- Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर उच्चाधिकार समितीची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती )

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्नाटकच्या नेत्यांच्या विधानावर भाष्य केले आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मुंबई केंद्रशासित करा या विधानाला काहीही अर्थ नाही. केवळ कर्नाटकच्या जनतेला बरे वाटावे या हेतूने हे विधान त्यांनी केले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.