बारावीचा निकाल लागल्यानंतर आता या मार्च महिन्यातील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना पुरवणी परीक्षा देण्याचा पर्याय आहे. या पुरवणी परीक्षेचं आयोजन देखील जाहीर करण्यात आलं आहे. राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑग़स्ट 2023 मध्ये होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुभा 29 मे ते 9 जून दरम्यान असणार आहे. बारावीची पुरवणी परीक्षा ही पुन्हा परीक्षा देणार्यांसाठी, खाजगी विद्यार्थ्यांसाठी, क्लास इम्प्रुव्ह साठी आयटीआयचे क्रेडिट ट्रांसफर करण्यासाठी आयोजित केलेली असते. यासाठी ऑनलाईन अर्ज 10 ते 14 जून दरम्यान आयोजित केले जाणार आहेत.
क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम मध्ये विद्यार्थ्यांना जुलै ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 असे पर्याय असतात. बारावीच्या परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले असे ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यांना आपल्या निकालाचे रिव्हॅल्युएशन करून घेण्याचाही पर्याय आहे. तुम्हांला उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी देखील पाहता येईल. या सशुल्क सेवा आहेत. त्यासाठी 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 3 % कमी लागला आहे. कोविड संकटानंतर यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची पुन्हा पहिल्याप्रमाणे पूर्ण अभ्यासक्रमावर 100% परीक्षा घेण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे कोकण विभागात निकालामध्ये अव्वल ठरला आहे तर मुंबई विभागामध्ये सर्वात कमी निकाल लागला आहे.
बारावीच्या निकालानंतर आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कधी लागणार याकडे देखील विद्यार्थी, पालकांचं लक्ष लागले आहे. मागील 2-3 वर्ष ऑनलाईन अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदाच थेट बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची सध्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.