Maharashtra HSC, SSC Results 2020: 12वी, 10वी निकाल तारखांबद्दल राज्य शिक्षण मंडळाकडून महत्त्वाची माहिती; पहा कधी लागू शकतो रिझल्ट
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Board Results 2020 Dates: सध्या राज्यात 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या HSC, SSC Results बद्दल आता दिवसागणिक उत्सुकता वाढत आहे. यंदा जून महिन्याच्या अंतिम टप्पा आला तरीही निकालाची तारीख जाहीर झालेली नाही. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदा जगभरात शिक्षण व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारी - मार्च महिन्यात पार पडलेल्या बोर्डाच्या परीक्षा निकालांच्या तारखा अद्याप जाहीर न झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. मात्र नुकतीच शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी निकालांच्या तारखांचे संकेत देणारी माहिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं  (msbshse)घेतलेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल (HSC Results Date) पुढच्या महिन्यात 15 तारखेपर्यंत आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Results Date) जुलै अखेरपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी काल दिली. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातही 10वी, 12वी निकालांच्या तारखांबद्दल खोट्या बातम्या व्हायरल होत होत्या. मात्र अशा व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. MHT CET 2020: कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढील सूचनेपर्यंत Common Entrance Test संबंधित सर्व परीक्षांना स्थगिती, उदय सामंत यांची माहिती.

दरम्यान यंदा राज्यात 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली, तर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीची परीक्षा दिली आहे. मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरसची दहशत सुरू झाल्याने परीक्षांवर आणि पेपर तपासणींच्या कामांवर त्याचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोनमधून नागरिकांना बाहेर पडण्यावर बंदी असल्याने पेपर तपासण्यासाठी शिक्षक, मॉडरेटर्स येऊ शकले नाहीत. राज्यात 9 विभागांमध्ये बोर्डाकडून परीक्षा घेतली जाते. या परीक्षांचे निकाल देखील सार्‍या विभागांकडून पेपर तपासणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जाहीर केली जातो.

बोर्डाचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

दरम्यान विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येतात. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमधून, शाळांमधून उपलब्ध करून दिली जाते.

महाराष्ट्रात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड व अन्य प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन प्रक्रिया आणि सप्टेंबर महिन्यात 11वीचे वर्ग सुरू करण्याचाविचार आहे.