Maharashtra Heavy Rains Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा, 'या' तारखेला मेघगर्जनेसह राज्यात पाऊस बरसण्याची शक्यता
Image used for Representational Purpose only | (Photo Credits: PTI)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD), महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मुक्काम 1 आठवडा वाढण्याची शक्यता आहे. या बातमीने राज्यातील शेतकरी चिंतेत असताना आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परतीचा पावसाचा वाढलेला मुक्काम आणि त्यात आता मुसळधार पावसाची शक्यता यामुळे बळीराजा पूरता हवालदिल झाला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 20, 21 आणि 22 तारखेला राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस (Heavy Rain) होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

येत्या 20 ते 22 दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्यामुळे नागरिकांना आणि संबंधित प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Maharashtra Rains Update: महाराष्ट्रात 'या' तारखेपर्यंत राहणार परतीचा पाऊस, पाहा आज कोणत्या जिल्ह्यात आहे मुसळधार पावसाची शक्यता

कालपासून राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरीही अजून पावसाचे संकट पूर्णपणे टळले नाही हेच या परिस्थितीवरुन दिसत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या शेतक-यांची चिंता आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यात जर दिवाळीत हा पावसाचा जोर कायम राहिला तर ऐन सणासुदीच्या काळात लोकांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा पाहणीदौरा सुरु केला आहे. या मुख्यमंत्री आज आणि उद्या असे दोन दिवस दौ-यावर असतील. यात ते सोलापूर आणि मराठवाडा जिल्ह्याचा पाहणीदौरा करणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबईत परतीचा पाऊस एक आठवडा लांबणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आपली योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडावे असेही सांगण्यात आले आहे.