Maharashtra Gudi Padwa Guidelines: कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर राज्यसरकारने जाहीर केली गुढी पाडव्यासाठी नियमावली; पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यास बंदी
CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANi)

चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा एक महत्वाचा आणि मोठा सण म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa 2021). शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे, म्हणजेच हिंदू वर्षाची सुरुवात याच दिवसापासून होते. यंदा 13 एप्रिल 2021 रोजी हा सण साजरा होईल. यादिवशी महाराष्ट्रात दारासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते. मात्र सध्या देशावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट पसरले आहे, त्यामुळे इतर सणांच्याप्रमाणेच हा सणही अगदी सध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या सणानिमित्ताने राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

या दिवसाचे औचित्य साधून राज्यात पारंपरिक वेशभूषेमध्ये मिरवणुका काढल्या जातात, अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुणे-मुंबई येथे काही ठिकाणी बाईक रॅलीही काढली जाते. आता राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. (हेही वाचा: गादी बनवण्यासाठी कापसाच्या ऐवजी चक्क वापरलेल्या मास्कचा वापर; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांनी केली कारवाई)

सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येता, सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा. हा सण सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंतच साजरा केला जावा. गुढीपाडच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच यादिवशी स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. मात्र हे करताना कोरोना निर्बंधांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे.

सध्या राज्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभुमीवर अनेक निर्बंध कडक केले आहेत. मात्र कदाचित राज्य सरकार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात, ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढविणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.