सध्या वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सरकार अनेक उपयोजना राबवत आहे. मास्कचा (Mask) वापर ही त्यातलीच एक गोष्ट. मात्र आता राज्यातील जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून या मास्कबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी गादी बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केला आहे, जिथे गादी बनवण्यासाठी कापूस व इतर वस्तूंच्या बदल्यात चक्क वापरलेल्या मास्कचा उपयोग होत होता. पोलिसांनी या कंपनीच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासह कंपनीच्या आवारातून पोलिसांनी बरेच मास्कही जप्त केले आहेत.
एनडीटीव्हीच्या मते, राजधानी मुंबईपासून जवळजवळ 400 किमी अंतरावर जळगावमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महानगरपालिका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना, कुसुंबा गावातील महाराष्ट्र गाडी कारखान्यात वापरलेल्या मास्क आणि हॅण्ड ग्लोव्जपासून गादी बनवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले, ‘अधिकाऱ्यांनी जेव्हा या कारखान्यावर छापा टाकला तेव्हा त्यांना याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरलेले मास्क आढळले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या गाद्या आणि शिल्लक मास्क नष्ट केले. या घटनेत गादी कारखाना मालक अमजद अहमद मनसुरी याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस या अवैध कामात सामील असलेल्या इतर लोकांचा शोध घेत आहेत. (हेही वाचा: मास्क न वापरणाऱ्यांकडून तब्बल 51.46 कोटी दंड वसूल- मुंबई महापालिका)
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात काल दिवसभरात 1116 रूग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 88,265 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11,750 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून, काल दिवसभरात 1167 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 101808 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1793 रूग्णांचा झाला मृत्यू झाला आहे.