महाराष्ट्र सरकार कडून महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या कामाच्या तासामध्ये कपात, 12 वरून  8 तासांची ड्युटी; Maharashtra DGP Sanjay Pandey यांची माहिती
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र सरकार आता राज्यातील महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या कामाच्या तासामध्ये (Working Hours of Women Police Personnel) मोठा बदल करणार आहे. राज्यातील महिला पोलिस कर्मचार्‍यांवर काम आणि घरगुती जबाबदारी पाहता त्यांच्या कामाच्या तासांमध्ये कपात करण्याचा विचार मागील काही दिवसांपासून सुरू होता. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे (Maharashtra DGP Sanjay Pandey) यांनी आज (24 सप्टेंबर) केलेल्या घोषणेमध्ये सरकार महिला कर्मचार्‍यांचे कामाचे तास 12 ऐवजी 8 तास करणार असल्याचं सांगितले आहे.

महाराष्ट्रात यापूर्वी पुणे आणि नागपूर मध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेण्यात आला होता. कालच अमरावती मध्ये देखील अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी आजपासून महिला कर्मचार्‍यांची ड्युटी 12 तासांऐवजी 8 तास करणार असल्याची घोषणा केली होती. त्याचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील कौतुक केले होते.

ANI Tweet

राज्यात नागपूर शहरामध्ये पहिल्यांदा महिला पोलिसांना आठ तास ड्युटी देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिस घटकांनी याचा विचार करावा अशा सूचना दिल्या होत्या. नागपूर पाठोपाठ पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील असाच निर्णय घेत महिलांच्या ड्युटीमध्ये चार तासांची कपात करत 8 तास ड्युटी केली. सध्या नागपूर, पुणे पाठोपाठ अमरावती या तिसर्‍या शहरात महिला अंमलदारांना 8 तास ड्युटीचा दिलासा मिळाला होता पण आता हा निर्णय संपूर्ण राज्यातील महिला अंमलदारांसाठी लागू करण्याच्या तयारी मध्ये सरकार असल्याची महासंचालकांनी आदेश दिल्याने अनेकींना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. असे ट्वीट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचं कौतुक केले आहे.