महाराष्ट्रात एकीकडे सांगली, सातारा, कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यात पूरपरिस्थिती (flood) आहे, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाडा अजूनही दुष्काळाच्या (Drought) छायेत आहे. यावर उपाय म्हणून आता कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये (Godavari Valley) सोडण्यात येणार आहे. तर वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देण्यात येणार आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाडामधील दुष्काळ काही प्रमाणात तरी कमी होईल. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत घोषणा केली.
आज 73 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषणही पार पडले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचा गोषवारा मांडला. राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करूनही जिथे अजूनही दुष्काळ आहे तिथे सरकार आता नव्या योजना राबवणार आहे. (हेही वाचा: भारतीय लष्करात होणार 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची निर्मिती; स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील IMP मुद्दे)
यासाठीचा पहिला प्रयत्न म्हणून कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे. तसेच वैनगंगा-नळगंगा योजनेअंतर्गत 480 किमीचा बोगदा तयार करून वैनगंगा नदीचे पाणी थेट पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणले जाणर आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी त्या भागातली सर्व अपूर्ण सिंचन योजना पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे.