Ro Ro Service (Photo Credits: Twitter)

कोकणात जाण्याचा प्रवास सुकर करण्यासाठी आता राज्य सरकार कडून रो रो बोट सर्व्हिस (Ro-Ro Boat Services) सुरू करण्याचा मानस आहे. राज्याचे मत्स्य आणि बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या गणेशोत्सवामध्ये (Ganeshotsav) कोकणवासीयांना ही सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

गणेशोत्सवामध्ये मोठ्या संख्येत चाकरमनी गावाला जातात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भायंदर येथून प्रवासी जाण्याची संख्या लक्षात घेता अधिकची बस सेवा आणि रेल्वे सेवा देखील अपुरी पडत असल्याने आता प्रवास वेगवान करण्यासाठी बोट सेवेचा विचार सुरू आहे.

रो रो बोट सेवेमधून आता प्रवाशांना त्यांची वाहनं देखील घेऊन जाता येणार आहेत. त्यामुळे या सेवेकडे आता कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई मध्ये रो रो सर्व्हिस माझगाव डॉक वरून सुटणार आहे तर कोकणात सिंधुदुर्ग मधील देवगड मध्ये तिला थांबा दिला जाईल. हा प्रवास साडेचार तासांचा असेल. पुढे ही सेवा गोवा पर्यंत वाढवली जाईल. मुंबई-गोवा प्रवास 6 तासांचा असणार आहे.

. "या उपक्रमामुळे हजारो कोकणवासियांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळेल आणि गणेश चतुर्थी दरम्यान एकूण प्रवासाचा अनुभव सुधारेल," असेही ते म्हणाले. Mumbai-Goa RoPAX Ferry Service: मुंबई गोवा दरम्यान RoPAX फेरी सर्व्हिस सुरू होणार; कार ही घेऊन जाता येणार .

सध्या मुंबई-अलिबाग रो रो सर्व्हिस सुरू आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.  महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड (MMB) रायगड किनाऱ्यालगत काशीद, रेवदंडा आणि दिघी येथे रो-रो सेवेसाठी नवीन जेटी बांधत आहे. ते सुमारे १८ महिन्यांत तयार होण्याची अपेक्षा आहे. दिघी या आगामी औद्योगिक शहराला जोडण्यासाठी राज्य सरकार रो-रो सेवेचीही योजना करत आहे.