CM Devendra Fadnavis (फोटो सौजन्य - X/@Dev_Fadnavis)

महाराष्ट्र सरकार कडून शासनाच्या सर्व विभागांना दीडशे दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम देण्यात आला आहे. यामधून सरकार विविध टप्प्यातील रिक्त पदांची ठोस माहिती समोर घेऊन येणार आहे. यामध्ये रिक्त पदांवर राज्य शासनाकडून 'मेगा भरती' होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. सध्या राज्य सरकारचे विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आगामी मेगा भरतीची माहिती दिली आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागांच्या भरतीबद्दल सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉ. नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न विचारले. Mahavitaran Bharti 2025: महावितरण मध्ये नोकरीची संधी; mahadiscom.in वर करा अर्ज.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने मागील शासन काळात 75 हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला त्या मध्ये 1 लाखापेक्षा जास्त पदांची भरती झाली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील 6860 पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची जात वैधता सादर न करू शकल्यामुळे ही पदे 'अधिसंख्य' मानण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांना पदावरून हटवले जाणार नाही, मात्र त्यांना बढती दिली जाणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर रिक्त झालेल्या 1343 पदांवर भरती पूर्ण झाली असून उर्वरित भरती प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.